पंजाबमधील पठाणकोटमध्ये (Pathankot) सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. ममून लष्करी तळावर काल रात्री उशिरा बेवारस बॅग आढळली होती. या बॅगमध्ये लष्कराचे पाच गणवेश सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. ‘स्वाट’ कमांडोचे पथक आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी आम्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांसमवेत मोहीम हाती घेतली आहे. पठाणकोट शहर परिसर आणि लष्कराच्या छावणीचा परिसर पिंजून काढण्यात येत आहे,  अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला दिली. पठाणकोटमध्ये हवाई दलाचे तळही आहे. गेल्या वर्षी याच हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तर २०१५ मध्येही दहशतवाद्यांनी येथील दिनानगर पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता.

ममून लष्करी छावणीत रात्री उशिरा बेवारस बॅग सापडली. बॅगमध्ये पाच शर्ट आणि दोन पॅंट होत्या. स्थानिक नागरिकाने या बॅगसंबंधी माहिती दिली. त्यानंतर पठाणकोट शहर आणि लष्कराच्या छावणी परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. एका संशयिताचा शोध घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी जानेवारीत १ आणि २ तारखेच्या मध्यरात्री चार दहशतवाद्यांनी सीमेपलिकडून घुसखोरी केली होती. त्यानंतर पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे सात जवान शहीद झाले होते. तर २०१५ मध्ये लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या तीन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी एक कारचे अपहरण केले होते. त्यानंतर गुरुदासपूर जिल्ह्यातील दिनानगरमधील पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यात एका पोलीस अधीक्षकासह सात कर्मचारी शहीद झाले होते.