पंजाबमधील पठाणकोट या सीमा रेषेवरील भागात सशस्त्र संशयित तरुण दिसल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  या भागात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम राबवली जात असून अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. संशयित तरुणांचे वृत्त समजताच पठाणकोटमधील सैन्य आणि हवाई दलाच्या तळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी संध्याकाळी पठाणकोटमध्ये सशस्त्र संशयित तरुण दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरात शोधमोहीम राबवली. यासंदर्भातील माहिती राज्याच्या गृहखात्यालाही देण्यात आली. यानंतर संपूर्ण पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. ‘आम्हाला संशयित दिसल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे तीन तास आम्ही या भागांमध्ये शोधमोहीम राबवली. अद्याप काही हाती लागलेले नाही. पण अजूनही आमची शोधमोहीम सुरु आहे’ असे पठाणकोटचे पोलीस अधीक्षक राकेश कौशल यांनी सांगितले. सुरक्षा दलाचे सुमारे ४०० जवान सध्या परिसरात शोधमोहीम राबवत आहेत.

जानेवारीमध्ये पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे सहा जवान शहीद झाले होते. सुमारे तीन दिवसांच्या चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांना पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.  भारत – पाकिस्तान सीमा रेषेपासून पठाणकोटजवळ असल्याने दहशतवाद्यांना येथील तळावर हल्ला करणे शक्य झाले होते. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते. काही  दिवसांपूर्वीच उरीतील लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात १९ जवान शहीद झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सीमा रेषेवरील गस्त वाढवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये सीमा रेषेजवळ दहशतवाद्यांना मार्ग दाखवणा-या दोघा जणांना अटक करण्यात आली होते. हे दोघे पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवासी होते.