गुजरातमध्ये भाजपला धक्का बसला असून, काही दिवसांपूर्वीच ‘कमळ’ हाती घेणारे पाटीदार समाजाचे नेते निखील सवानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप फक्त लॉलिपॉप दाखवत असून प्रत्यक्षात ते काहीच करत नाही, अशी टीका करत निखिल सवानी यांनी भाजपला रामराम केला. लवकरच राहुल गांधींची भेट घेणार असे त्यांनी स्पष्ट केले.

हार्दिक पटेलच्या ‘पाटीदार अनामत आंदोलन समिती’तील नेत्यांना पक्षात आणून पाटीदार समाजाची मते मिळवण्याची रणनिती भाजपने आखली होती. मात्र भाजपला लागोपाठ दोन धक्के बसले. भाजपत प्रवेश करण्यासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केल्यानंतर निखिल सवानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

भाजपने पाटीदार समाजातील नेत्यांना आमिष दाखवत त्यांना पक्षात सामील करुन घेण्याचा धडाकाच लावला आहे. मात्र नरेंद्र पटेल यांनी सत्य जगासमोर आणले. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे सवानी यांनी म्हटले आहे. पटेल हे गरीब कुटुंबातून आले असून तरीदेखील त्यांने पैसे नाकारले हे कौतुकास्पदच आहे, असे त्यांनी सांगितले. चांगले काम करण्यासाठी मी भाजपत प्रवेश केला, पण पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपकडून हालचाली होताना दिसत नाही. पाटीदार समाजाला आरक्षण देणार हे लॉलिपॉप गेल्या अनेक वर्षांपासून दाखवले जात आहे. पण होत काहीच नाही, म्हणून भाजपमधून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजप आश्वासन पूर्ण करत नसून पाटीदार समाज भाजपला माफ करणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

वाचा: ‘मला भाजपकडून १ कोटी रुपयांची ऑफर’

मी पुन्हा हार्दिक पटेलच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये जाऊन काम करणार, असे त्यांनी सांगितले. मात्र राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला राहुल गांधींच्या भेटीसाठी वेळ मिळालेली नाही, मात्र लवकरच त्यांना भेटायला जाईन, असे त्यांनी सांगितले. शनिवारी हार्दिक पटेलचे निकटवर्तीय वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. तर रविवारी रात्री नरेंद्र पटेल यांनी पत्रकार परिषद भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपत प्रवेश करण्यासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. यातील १० लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.