जम्मू-काश्मीर राज्यामध्ये पुरात अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून यामध्ये आता पवन हंस हेलिकॉप्टर लिमिटेड आणि इतर खासगी हेलिकॉप्टर कंपन्यांनी मदतीचा हातभार लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बचावकार्याला वेग येण्याची शक्यता आहे.
हवाई दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून पवन हंस आणि ग्लोबल व्हेक्ट्रा यांसारख्या हेलिकॉप्टर कंपन्यांनीही बचावकार्यात हवाई दलाची मदत करण्यास सुरूवात केली आहे. तसेच एअर इंडियाची दोन विमाने देखील मदत साहित्य आणि पूरग्रस्तांसाठीच्या आवश्यक वस्तूंनी सज्ज असल्याची माहिती नागरी विमानोड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बचावकार्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्कालिन व्यवस्थापन दला’च्या मदतीला नौदलाचे २०० सैनिक पाठविण्यात आले आहे. त्यांच्याबरोबत ७० नौका पाठविण्यात आल्या असून, नवी दिल्ली, जम्मू आणि श्रीनगरमध्ये नियंत्रण कक्ष बनविण्यात आले आहे.दरम्यान चार दिवसांनंतर वैष्णोदेवी यात्रा सुरु झाली असून, १७ हजार ७०० भाविक रवाना झाले आहेत.