विणकरांना योग्य वेतन मिळाले पाहिजे तसेच हातमाग व्यवसाय जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त कार्यक्रमांचे उद्घाटन करताना त्यांनी सांगितले की, चित्रपट उद्योगाने हातमाग व्यवसाय त्यांच्या चित्रपटात हातमागाचे कपडे वापरून लोकप्रिय करावा. विणकरांचे वेतन वाढण्यासाठी हा व्यवसायही वाढला पाहिजे. भारतीय हातमाग उद्योगाला योग्य ती मान्यता मिळविण्यात देश कमी पडला आहे त्यामुळे हा उद्योग जागतिक पातळीवर नेला पाहिजे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून ते शक्य आहे. हातमाग उत्पादने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जगभरात विकता येतील. वस्त्रोद्योग मंत्रालयाने डिझाइनमधील अभिनव कल्पनांसाठी पारितोषिके दिली पाहिजेत. विणकरांचे वेतन वाढले पाहिजे व त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. विणकरांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करा, त्यात कुणी मध्यस्थ असता कामा नये. तीन नवीन सामाजिक सुरक्षा योजना असंघटित क्षेत्रासाठी सुरू केल्या आहेत. विणकरांची कष्ट करण्याची ताकद मोठी आहे व आई जितक्या प्रेमाने मुलीला वाढवते तितक्या प्रेमाने ते ही वस्त्रे विणतात. हातमागाच्या कपडय़ांचा वापर वाढत आहे. आईने वाढलेल्या अन्नाचे महत्त्व हातमागाला आहे. आई जसे प्रेमाने अन्न तयार करते व वाढते तेच काम विणकर प्रेमाने वस्त्रे विणून करीत आहेत. आपण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खादीच्या वापराचे आवाहन केले होते त्यानंतर खादीचा खप ६० टक्केवाढला होता.