सरकारने आधार कार्डाला स्मार्ट कार्डमध्ये उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली असून, सध्या कागदी स्वरुपात मिळत असलेले ‘आधार कार्ड’ लवकरच ‘स्मार्ट कार्ड’ स्वरुपातदेखील नजरेस येईल. नवे आधार कार्ड पीवीसी प्लॅस्टिक कोटेड असेल. आधार कार्डधारकास यासाठी ६० रुपये मोजावे लागतील. ६० रुपये दिल्यावर आधार कार्डाची दोन स्मार्ट प्रिंट मिळतील. स्मार्ट आधार कार्ड मिळविण्यासाठी आधार कार्डसाठीची नोंदणी असणे गरजेचे आहे. आधार कार्डधारक किंवा ज्यांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे, असे सर्वजण आपले आधार कार्ड पीवीसी प्लॅस्टिक कोटेड कार्डामध्ये परिवर्तित करू शकतात. यासाठी नोंदणी क्रमांक अथवा आधार कार्ड क्रमांक सोबत न्यावा लागेल. ज्याचे आधार कार्ड आहे त्या व्यक्तीला प्रत्यक्ष केंद्रावर जावे लागेल. संबंधित व्यक्तीचा आधार कार्ड अथवा नोंदणी क्रमांक प्राप्त झाल्यावर केंद्रातील कर्मचारी त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतील. स्मार्ट कार्डासाठीचे पैसे जमा केल्यानंतर आधार कार्डाच्या दोन प्रिंट मिळतील. दोन्ही प्रिंट प्लॅस्टिक कोटेड असतील.