नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांसाठी ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरलेल्या ‘पेटीएम’ या डिजिटल पेमेंट सर्व्हिसने आता व्हॉट्स अॅपला टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमच्या अॅपवर आता मेसेजही पाठवता येणार असून याद्वारे व्हॉट्स अॅपला आव्हान देण्याचा पेटीएमचा प्रयत्न आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या ‘व्हॉट्स अॅप’ने काही दिवसांपूर्वी भारतात ‘डिजिटल पेमेंट सर्व्हिस’ क्षेत्रात उतरण्याचा मानस व्यक्त केला होता. ‘व्हॉट्स अॅप’वर पलटवार करण्यासाठी पेटीएमने आता त्यांच्या अॅपवर ‘मेसेजिंग सर्व्हिस’ देण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएम युजर्सना अॅपवरुन मेसेजसोबतच व्हिडिओ, ऑडिओ आणि फोटो पाठवता येतील. येत्या महिना अखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल असे समजते.

‘व्हॉट्स अॅप’ने काही दिवसांपापूर्वी भारतात डिजिटल पेमेंट क्षेत्रात उतरण्याचा मानस व्यक्त केला होता. ‘व्हॉट्स अॅप’ या साठी यूपीआयसोबत चर्चाही करत असल्याचे वृत्त आहे. यापार्श्वभूमीवर ‘पेटीएम’चा निर्णय महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ‘पेटीएम’ यावर काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या वृत्तावर पेटीएमने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनमधील ‘अलीबाबा’ आणि जपानमधील ‘सॉफ्टबँक’ने पेटीएममध्ये गुंतवणूक केली असून यामुळे ‘पेटीएम’कडे तूर्तास भक्कम आर्थिक पाठिंबा आहे. नोटाबंदीनंतर पेटीएमच्या नफ्यात भरघोस वाढ झाली होती. कंपनीचा शेअर मार्केटमधील भावही वधारला होता.

भारतातील ‘हाईक’ या मेसेजिंग अॅपनेही यापूर्वी डिजिटल पेमेंटची सुविधा दिली होती. डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात उतरुन व्यवसायाचा विस्तार करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे. पेटीएमचे भारतात २२ कोटी ५० लाख युजर्स आहेत. तर फेब्रुवारीच्या अहवालानुसार व्हॉट्स अॅपचे भारतात २० कोटी अॅक्टीव्ह युजर्स आहेत. मेसेजची सुविधा दिल्यास पेटीएमला मोठा फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे.