भाजपचे सरचिटणीस राम माधव यांचे स्पष्टीकरण

पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजप यांच्यात कुठलाही बेबनाव नसून, अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकांत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या संवादाच्या अभावामुळे असल्याचे भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी म्हटले आहे.

आमच्यात कुठलीही दुही नाही. विधान परिषद निवडणुकीच्या संबंधात काही मुद्दे होते, मात्र त्या प्रकरणी दोन्ही पक्षांमध्ये संवादाचा अभाव असल्याचे आमच्या लक्षात आले. या मुद्यावर उपाय शोधला जाईल, असे माधव यांनी पत्रकारांना सांगितले.

येत्या एक-दोन महिन्यात काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुरळीत करण्यास पीडीपी- भाजप सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठी राज्य प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत आहे, असेही जम्मू-काश्मीरसाठी भाजपचे संवादक असलेले राम माधव म्हणाले.

जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, खोऱ्यातील परिस्थिती चिघळण्यास प्रतिबंध करण्याचा संवाद हाच एकमेव मार्ग असल्यावर भर दिल्यानंतर माधव यांनी हे वक्तव्य केले आहे.