जम्मू काश्मीरमधील सत्ताधारी पक्ष पीपल डेमोक्रॅटिक पार्टीचे पुलवामा जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी डार यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी रोहिमो या ठिकाणी गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या आधी पीडीपी नेते आणि मंत्री फारुख अंद्राबी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्या वेळी ते घरी नव्हते. अंद्राबी यांच्या सुरक्षारक्षकांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्या चकमकीमध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाले होते.

जम्मू काश्मीरमधील मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीडीपीने भारतीय जनता पक्षाची सोबत सोडावी यासाठी दहशतवादी पीडीपीवर दबाव टाकत असल्याचा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतील मतदानाचे कमी प्रमाण आणि काश्मीरमधील सुरक्षेच्या प्रश्नांवर मोदींसोबत चर्चा केल्याचे मुफ्ती यांनी सांगितले. राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्यावर भर देण्याची विनंती मुफ्ती यांनी सरकारकडे केली.

जम्मू काश्मीरमधील हिंसाचार उफाळून आला असतानाच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या राजधानीत आल्या आहेत. पोटनिवडणुकीतील कमी मतदान आणि राज्यातील सुरक्षा व्यवस्था यासंदर्भात मोदींसोबत चर्चा झाल्याचे मुफ्तींनी सांगितले. मेहबूबा म्हणाल्या, राज्य सरकार दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून केंद्र सरकारने राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे अशी विनंतीही त्यांनी याप्रसंगी केली. मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मार्गाचे अनुकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. वाजपेयींनी नेहमीच सलोख्यावर भर दिला अशी आठवणही मुफ्ती यांनी करुन दिली. आधी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. चर्चा आणि दगडफेकीच्या घटना एकाच वेळी होऊ शकत नाही असे त्यांनी नमूद केले.