केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी जम्मू काश्मीर खोऱ्यातील हिंसक आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांकडून वापरण्यात येत असलेल्या पेलेट गनवर पर्याय शोधणार असल्याचे म्हटले होते. पेलेट गनऐवजी मिरचीचे गोळे असलेले पावा शेल्सचा वापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बनवलेल्या तज्ज्ञांच्या समितीने पावा शेल्सला मान्यता दिली असल्याचे बोलले जात आहे.
काश्मीर खोऱ्यात दहशतवादी बुऱ्हाणवानीच्या हत्येनंतर अशांतता पसरली आहे. आंदोलक हिंसक झाले असून ते सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करत आहेत. त्यामुळे गेल्या ४९ दिवसांपासून येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलाकडून पेलेट गनचा वापर केला जात आहे. या पेलेट गनमधून निघालेले छर्रे शरीरात खोलवर घुसतात. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींना दृष्टी गमवावी लागली आहे. त्यामुळे पेलेट गनवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या पाश्वभुमीवर या बदलाचे संकेत आहेत.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यात २०१० मध्ये झालेल्या हिंसाचारात पेलेट गनचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. या हिंसाचारात सुमारे १०० हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृह मंत्रालय, जम्मू काश्मीर, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, आयआयटी, दिल्ली आणि शस्त्रात्र कारखाना मंडळ असे सात सदस्य जमावाला शांत करण्याच्या पद्धतींवर अभ्यास करत आहेत.
काय आहे पावा शेल्स
पावा म्हणजे पेलागॉर्निक अॅसिड व्हॅनीलल अॅमाइड. पावाच्या माऱ्याने  (मिरचीच्या गोळ्यांनी) आंदोलकांच्या शरीराचे जास्त नुकसान होणार नाही. हे गोळे आंदोलकांच्या अंगावर डागल्यास डोळयाची आणि शरीराची आग होईल. पण कोणतीही जिवीतहानी होणार नाही. नैसर्गिक मिरचीपासून गोळे बनवले आहेत.