काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे पतीला पत्नीचा मृतदेह खांद्यावरून वाहून न्यावा लागल्याची घटना ताजी असतानाच प्रशासनाच्या उदासीनतेचे वाभाडे काढणारी आणखी एक घटना बिहारमध्ये उघडीकस आली आहे. बिहारच्या कटिहार येथे रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे नातेवाईकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीतून नेण्याची वेळ आली. १४ दिवसांपूर्वी गंगा नदीत बुडून या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आज हा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आणि कटिहार रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. याठिकाणी सुरूवातीला मृतदेहाचे शवविच्छेदन करू, असे सांगण्यात आले. मात्र, २४ तास झाल्यानंतर डॉक्टरांनी हा मृतदेह भागलपूरला नेण्यास सांगितला. मात्र, नातेवाईकांनी मृतदेह भागलपूरपर्यंत नेण्यासाठीचा खर्च उचलण्यास असमर्थता दर्शविली. पैसे नसल्यामुळे मृताच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, डॉक्टरांनी रूग्णवाहिका देण्यास नकार दिला. त्यामुळे आम्हाला मृतदेह मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून भागलपूरपर्यंत न्यावा लागला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.