मुदत ठेवीच्या (फिक्स्ड डिपॉझिट) माध्यमातून मोठे उत्पन्न मिळवणारे लोक आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मुदत ठेवींच्या माध्यमातून ५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांवर आता आयकर विभागाची नजर असेल. बँकांमधील मुदत ठेवींवरुन व्याज मिळवणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. मुदत ठेवींवर मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती कर भरताना न देणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आता आयकर विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

मुदत ठेवींच्या माध्यमातून ५ लाखांचे उत्पन्न मिळवणारे लोक आता रडारवर असणार आहेत. अशा प्रकारचे हजारो लोक देशात असल्याचा अंदाज आयकर विभागाला आहे. त्यामुळेच आयकर विभाग सतर्क झाला आहे. कर भरणाऱ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणाऱ्या, मात्र आयकर भरताना उत्पन्न कमी दाखवणाऱ्यांवरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर असेल. टाईम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणाऱ्या व्यावसायिकांवरदेखील आयकर विभागाची नजर असेल. काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. मात्र ही सर्व रक्कम रोख रकमेच्या स्वरुपात घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा लोकांना पकडणे अतिशय कठीण असते. त्यामुळे ठराविक कालावधीत या लोकांच्या घरांवर किंवा कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात येणार आहेत. उदाहरणार्थ, पावसाच्या दिवसांमध्ये डेंग्यू आणि मलेरियामुळे मोठ्या प्रमाणात लोक डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे या काळात डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असते. ही रक्कम फीच्या माध्यमातून जमा झालेली असते. अशाच प्रकारे ठराविक काळात व्यावसायिकांवर छापे टाकण्याची आयकर विभागाची योजना आहे.

मुदत ठेवीच्या माध्यमातून होणारी कमाई शोधण्यासाठी आयकर विभाग बँकांकडून माहिती मिळवणार आहे. बँकांकडून मुदत ठेवींवर टीडीएस कापला जातो. अनेकदा मुदत ठेवींवरील व्याजावर ३० टक्के आयकर लागू होत असतानाही लोक केवळ १० टक्केच कर भरतात. याच मोठ्या कर चोरांवर आता आयकर विभागाची नजर असेल. यामुळे आयकर भरणा करणाऱ्यांच्या संख्येत १ कोटींची वाढ होईल, अशी माहिती आयकर विभागातील एका कर्मचाऱ्याने दिली.