नोटाबंदीनंतर अनेक धनाढ्यांनी आपला काळा पैसा गरिबांच्या जनधन खात्यात जमा केला आहे. त्यांना असंच सोडणार नाही. त्यांना तुरुंगात पाठवू. जो पैसा गरिबांच्या खात्यात जमा झाला आहे, तो त्यांचाच होईल, यासाठी सरकार प्रयत्न करील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरादाबादमधील परिवर्तन सभेत म्हणाले. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली. जे सुरुवातीला फक्त मनी-मनी करत होते, ते आता मोदी-मोदी करत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

या सभेत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसने ७० वर्षे लोकांना रांगांमध्ये उभे राहायला लावले. मी या रांगांना संपवण्यासाठी ही अखेरची रांग लावली आहे, असे ते म्हणाले. लोकांचे कष्ट, त्याग आणि संघर्ष वाया जाऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. बेईमानीचे सर्व रस्ते बंद करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, असे आवाहनही त्यांनी केले. मी नोटा छापून बेईमान लोकांना संधी देऊ इच्छित नाही. भ्रष्टाचाराने देशाला लुटले आहे. गरिबांचे हक्क हिरावून घेतले आहेत. त्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्याला केवळ भ्रष्टाचारच जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.

माझा देश २१ व्या शतकातील आहे. डिजिटल इंडिया बनण्यासाठी तयार झाला आहे. या देशात ४० कोटी स्मार्ट फोन आहेत. किमान ४० कोटी लोक तरी या नोटांच्या चक्रातून बाहेर पडल्यास भ्रष्टाचार संपेल, असेही त्यांनी सांगितले. जे लोक गरिबांच्या जनधन खात्यात काळा पैसा जमा करत आहेत. त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही तो पैसा खात्यातून काढला नाही, तर मी त्यावर काहीतरी उपाय शोधून काढीन. बेईमान लोक बँकांसमोर रांगा लावू शकत नाहीत. पण ते गरिबांच्या घरासमोर रांगा लावत आहेत. गरिबांना ते जाळ्यात ओढू पाहत आहेत. काही लोक गरिबांच्या पाया पडत आहेत. कधी कुणा श्रीमंत व्यक्तीला गरिबाचे पाय धरताना पाहिले आहे का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.