दूध, स्वादयुक्त दूध व आइस्क्रीम या पदार्थाचे अन्नसुरक्षा निकष कडक केले जाणार आहेत. अन्नसुरक्षा व प्रमाणन प्राधिकरण या संस्थेने अलीकडेच चीनमधून आयात केलेल्या दूध व दुधाच्या पदार्थावर बंदी घातली असून, ती जून २०१६पर्यंत लागू राहणार आहे. या दुधात मेलॅमाइन सापडले होते.
सध्या या संस्थेचे दूध, पनीर, तूप, लोणी यासाठी काही सुरक्षा निकष आहेत, पण नवीन प्रस्तावानुसार दुधाच्या स्निग्धांशाबाबत अधिक कठोर निकष लावले जाणार आहेत. आइस्क्रीममध्येही ते फुगलेले दिसावे यासाठी सोडा घातलेला असतो. सूत्रांनी सांगितले, की दूध व दुधाचे पदार्थ यासाठी नवीन निकष तयार केले जात आहेत. त्यात आइस्क्रीम व स्वादयुक्त दुधाचा समावेश आहे. दुधात कीटकनाशके व धातूचे प्रमाण किती असेल तर सुरक्षित मानावे याचा विचार केला जात आहे.