बान की मून यांची अपेक्षा
मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहताना संयुक्त राष्ट्रांचे सचिव बान की मून या हल्ल्यांच्या सूत्रधारांना शिक्षा झाली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन केले. गुरुवारी या हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाली.
पाकिस्तानी भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी कारवायांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. भारत-पाकिस्तानमधील सुधारलेल्या संबंधांमुळे दोन्ही देशांना दहशतवादाचा मुकाबला करणे सोपे जाईल. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला दहशतवादामुळे मोठाच धोका निर्माण झाला आहे. लेबॅनॉन आणि पॅरिसमध्ये झालेले हल्ले त्याचेच निदर्शक आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी एकत्रित येऊन दहशतवादाचे आव्हान परतवून लावले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘लष्कर-ए-तय्यबा’चा म्होरक्या झकी उर रहमान लख्वी हा मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार आहे. तो ‘लष्कर-ए-तय्यबा’चा संस्थापक हाफीज सईद याचा नातेवाईकदेखील आहे. त्याला २००९मध्ये पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. सहा वर्षे तुरुंगात ठेवल्यानंतर पाक सरकारने त्याला मुक्त केले. त्याविरोधात भारताने तीव्र आक्षेप नोंदविला होता. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत अशोक मुखर्जी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला यासंदर्भात पत्रही लिहिले होते. ‘अल कायदा’शी संबंधित असणाऱ्या आणि दहशतवादी म्हणून नोंद असणाऱ्या लख्वीला जामीन मंजूर होऊ शकत नाही, तसेच त्याची मालमत्ता गोठवल्यानंतर तो पैशाचे व्यवहारही करू शकत नाही, असे मुद्दे भारताने आपल्या पत्रात मांडले होते. एखादी व्यक्ती दहशतवादी म्हणून घोषित झाल्यानंतर त्याच्यावर संयुक्त राष्ट्रे वेगवेगळे र्निबध लादतात. लख्वीच्या बाबतीत त्या र्निबधांचे उल्लंघन झाल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या निदर्शनास आणून दिले होते.