विद्यार्जनासारखे पवित्र कार्य करत असलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर निर्घृणपणे गोळीबार करून हत्याकांड घडवून आणण्याच्या तालिबान्यांच्या कृत्यावर जगभरातून टीका होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर झालेला हा जगातील सर्वात मोठा आत्मघातकी हल्ला असून अनेक देशांनी
या कृत्याचा निषेध केला आहे.

हा भ्याड हल्ला असून क्रूरतेचा कळस आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. अशी घटना पुन्हा होऊ नये, हीच प्रार्थना.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ही अत्यंत वाईट घटना असून क्रौर्याची परिसीमा काय असते, हेच यातून दिसून येते. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आहे.
– राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

हल्ल्याचे हे कृत्य अतिशय क्रूर आहे. याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. मानवतेवरच हा हल्ला असून ज्यांचे कुटुंबीय या हल्ल्यात मारले गेले आहे, त्यांना हे दु:ख सोसण्याचे बळ ईश्वर देवो, हीच आमची प्रार्थना आहे.
– सईद अकबरुद्दीन, भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते

मानवतेला काळिमा फासणारी अशी ही घटना आहे. दहशतवादाचा चेहरा किती क्रूर असू शकतो, हेच या निमित्ताने जगासमोर आले आहे. या कृत्याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे.
– भारतीय कम्युनिस्ट पक्ष

अमेरिका या भ्याड हल्ल्याचा निषेध करते. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर झालेला हा दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. दहशतवादाचा नि:पात करण्याचा इरादा यातून अधिकच मजबूत होईल आणि त्यात आम्ही पाकिस्तानला सदैव साथ देऊ.
– रिचर्ड ओल्सन, अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत

पाकिस्तानात शाळेवर झालेला हल्ला ही दुर्दैवी घटना आहे. केवळ शाळेत जातात म्हणून विद्यार्थ्यांना अत्यंत निर्घृणपणे ठार करणे हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य आहे. या संकटसमयी आम्ही पाकिस्तानला धीर देऊ इच्छितो.
– डेव्हिड कॅमेरून, ब्रिटिश पंतप्रधान

पाकिस्तानला नेहमीच दहशतवादी हल्ल्यांना तोंड द्यावे लागते. मात्र शाळेवरील हा हल्ला म्हणजे अत्यंत निषेधार्ह घटना आहे. त्या निष्पापांनी तालिबान्यांचे काय बिघडवले होते. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.
– फ्रँक वॉल्टर स्टेइनमेर, जर्मनीचे परराष्ट्रमंत्री

या हल्ल्याचे समर्थन होऊच शकत नाही. अत्यंत क्रूर आणि घृणास्पद असे हे कृत्य आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. संपूर्ण देश या दु:खद प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. १८ डिसेंबरला दिलेली देशव्यापी बंदची हाक आम्ही मागे घेत आहोत.
– इम्रान खान, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे अध्यक्ष

पेशावरमधील घटना दुर्दैवी आहे. या संकटसमयी मी माझ्या देशबांधवांबरोबर आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी मी प्रार्थना करत असून जगभरातील लाखो लोकांचीही हीच भावना असेल. असा प्रकार भविष्यात होऊ नये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मलाला युसुफझाई, नोबेल पारितोषिक विजेती.

अपनी मर्जी से तो मजहब भी नहीं उसने चुना था,
उसका मजहब था जो माँ-बाप से ही उसने विरासत में लिया था
अपने माँ-बाप चुने कोई यह मुमकीन ही कहां है,
मुल्क में मर्जी थी उसकी ना वतन उसकी रजा था
वो तो कुल नौही बरस का था उसें क्यूं चुन कर,
फिरकदराना फसादात ने कल कत्ल किया!!
कवी गुलजार

पाकिस्तान सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाय योजावेत. असे हल्ले पुन्हा भविष्यात घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
– कैलाश सत्यार्थी,    नोबेल पारितोषिक विजेते

‘पाकिस्तानला चांगला धडा मिळाला’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या माझ्या देशबांधवांनो, या हल्ल्यात जी मुले मेली ना ती तुमच्या-आमच्या मुलांसारखीच निष्पाप होती. याचा जरा विचार कराच.
– ओमर अब्दुल्ला,  काश्मीरचे मुख्यमंत्री

या हल्ल्यात हकनाक बळी गेलेल्यांच्या मृतात्म्यांना शांती लाभो. अतिशय लांच्छनास्पद असा हा हल्ला आहे.
– वीरेंदर सेहवाग, क्रिकेटपटू