अमेरिकेचे निसर्गशास्त्रज्ञ व लेखक पीटर मॅथिएसन (वय ८६) यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले. त्यांचे अ‍ॅट प्ले इन फील्ड्स ऑफ लॉर्ड हे पुस्तक विशेष गाजले.
 त्यांच्या प्रकाशक  असलेल्या रिव्हरहेड बुकस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ते आमचे लेखक होते. निसर्गाची ओढ असलेले सौंदर्यासक्त मन त्यांना लाभले होते. गेल्या वर्षी मॅथिएसन यांच्यावर रक्ताच्या कर्करोगासाठी उपचार करण्यात आले होते. त्यांची शेवटची कादंबरी ‘इन पॅराडाइज’ ८ एप्रिलला प्रसिद्ध होते आहे असे रिव्हरहेड बुकसने म्हटले आहे. ‘द पॅरिस रिव्ह्य़ू’ या साहित्यविषयक नियतकालिकाच्या संस्थापकांपैकी ते एक होते.
एक चांगले गिर्यारोहक व उदार पर्यावरणवादी असलेले मॅथिएसन यांनी १९६१ मध्ये ‘अ‍ॅट प्ले इन द फिल्ड्स ऑफ द लॉर्ड’ हे पुस्तक लिहिले त्यामुळे ते कादंबरीकार म्हणून उदयास आले.  
या कादंबरीत त्यांनी ब्राझीलच्या अ‍ॅमेझॉन जंगलातील मूळ लोक व तेथे जंगलतोड करणारे भाडोत्री लोक यांच्यातील संघर्ष टिपला आहे. त्यावर एक हॉलीवूड चित्रपट निघाला, त्यात जॉन लिथगो व डॅरील हना यांच्या भूमिका होत्या.  
‘द स्नो लेपर्ड’ व ‘श्ॉडो कंट्री’ या पुस्तकांसाठी त्यांना नॅशनल बुक अ‍ॅवॉर्ड मिळाले होते. हे पुस्तक हिमालयाच्या सफरीवर आधारित आहे. त्यांचे बालपण साध्या मुलाप्रमाणे असले तरी त्यांच्या साहसांमुळे ते आशियातून ऑस्ट्रेलियात तेथून न्यू गिनीयात नंतर दक्षिण अमेरिकेत गेले. १९५० मध्ये ते पॅरिसमध्ये सीआयएचे हेर होते. त्यांनी एकूण तीसहून अधिक पुस्तके लिहिली. कादंबरी व कादंबरी सोडून इतर लेखनासाठी नॅशनल बुक अ‍ॅवॉर्डने  गौरवण्यात आलेले ते एकमेव लेखक होते.