‘अभिनव भारत’च्या चौथ्या गोळीचा दावा पडताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून विधिज्ञ शरण यांची नियुक्ती 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या फेरतपासाची खरोखरच आवश्यकता आहे का? गांधीजींवर नथुराम गोडसेच्या तीन गोळ्यांबरोबरच कुणा एका ‘अज्ञाता’ने चौथीही गोळी झाडल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे? हे प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये शुक्रवारी सुनावणीस आले. खंडपीठाला फार दखल घ्यावीशी वाटली नाही; पण तरीही याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अमरेंद्र शरण यांची न्यायालयाचा मित्र (अ‍ॅमिकस क्युरी) म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश दिला.

गांधीजींच्या हत्या प्रकरणाचा तपास नीट झालेला नाही आणि त्यांच्या हत्येमागचे खरे षड्यंत्र जगापासून दडविण्यात आल्याचा दावा करून मुंबईस्थित डॉ. पंकज फडणीस यांनी हत्येच्या फेरतपासाची मागणी करणारी विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची सुनावणी न्या. शरद बोबडे आणि न्या. एल. नागेश्वरराव यांच्या खंडपीठापुढे सुमारे वीस मिनिटांसाठी झाली. हत्येच्या घटनेला (३० जानेवारी १९४८) आणि नथुराम गोडसे व नारायण आपटे या दोन मारेकऱ्यांना फाशी देऊन (१५ नोव्हेंबर १९४९) ६७ वर्षे उलटलीत. तसेच हत्येमागचे षड्यंत्र शोधण्यासाठी नेमलेल्या जे.एल. कपूर आयोगाच्या अहवालालाही (१९६९) सुमारे ४७ वर्षे झाल्याचा संदर्भ देत खंडपीठाने फेरतपासाबाबत कायद्यानेही फार काही करता येणार नसल्याचे सूचित केले. ‘राजकीय चर्चा व अटकळींच्या आधारांवर आम्ही आदेश देणार नाही. फेरतपासाची मागणी मान्य करण्यासाठी (संबंधित) व्यक्ती तरी खटल्याला सामोरे जाण्यासाठी जिवंत हवीत ना?’, अशी टिप्पणी न्या. बोबडेंनी केली.  एकंदरीत फेरतपासाला खंडपीठ फार अनुकूल दिसत नव्हते. मात्र, तरीही डॉ. फडणीस यांच्या आग्रही युक्तिवादानंतर न्यायालयाला मदत करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ शरण यांची नियुक्ती करण्याचा निर्णय खंडपीठाला घ्यावा लागला. फडणीस यांच्या सर्व दाव्यांचा साकल्याने विचार करून शरण हे आपला अहवाल तयार करतील आणि त्याआधारे याचिकेबाबतची पुढील कार्यवाही खंडपीठ निश्चित करेल. ३० ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. ‘खंडपीठाने आता नोंदविलेली (प्राथमिक) निरीक्षणे तुमच्यावर बंधनकारक नाहीत. तुम्ही स्वत: कागदपत्रांची तपासणी करा आणि तुमचा अहवाल द्या,’ असे खंडपीठाने शरण यांना स्पष्ट केले.

गांधी हत्या खटल्यातील आरोपी आणि नंतर पुराव्यांअभावी निर्दोष सुटलेले वीर सावरकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या ‘अभिनव भारत’ या मुंबईस्थित संस्थेचे फडणीस हे पदाधिकारी आहेत. अनेक कागदपत्रांचे संशोधन करून त्यांनी गांधीजींच्या हत्येच्या फेरतपासाची मागणी केली आहे. अगोदर ते मुंबई उच्च न्यायालयात गेले होते; पण न्यायालयाने कपूर आयोगाचा हवाला देत याचिका फेटाळली. त्याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

‘अज्ञात व्यक्तीच्या चौथ्या गोळीने गांधीजींचा मृत्यू..’

गांधींजींच्या हत्येमागे मोठे कारस्थान असून ते पद्धतशीरपणे दडपण्यात आल्याचा दावा करून फडणीस यांनी याचिकेमध्ये नथुराम गोडसेंनी झाडलेल्या तीन गोळ्यांनी नव्हे, तर ‘अज्ञात व्यक्ती’च्या चौथ्या गोळीने महात्माजींचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. ‘गोडसेकडील पिस्तुलाची क्षमता सात गोळ्यांची होती. पण त्याने तीनच गोळ्या झाडल्या आणि उरलेल्या चार गोळ्या त्याच्याकडून हस्तगत केल्याची नोंद पोलीस अहवालात आहे. पण महात्माजींवर तर चार गोळ्या झाडल्या गेल्या. मग ही चौथी गोळी कुणी झाडली? त्या दुसऱ्या मारेकऱ्याचा तपास का झाला नाही?,’ असा सवाल त्यांनी केला आहे. त्याच्या समर्थनार्थ त्यांनी विविध कागदपत्रे सादर केली आहेत. महात्मा गांधी व पाकचे महंमद अली जीना यांना एकत्र येण्यापासून रोखण्याच्या कटामुळे गांधीजींची हत्या केल्याचा त्यांचा संशय आहे. जे.एल. कपूर यांच्या न्यायालयीन आयोगाने हत्येचा तपास नीट केला नसल्याचाही आरोप त्यांनी केला.