भारताच्या इतिहासकालीन ऐश्वर्याचे प्रतिक असणारा ब्रिटनमधील कोहिनूर हिऱ्यावर आता पाकिस्तानकडून हक्क सांगण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये असलेला कोहिनूर हिरा पाकिस्तानमध्ये परत आणण्यात यावा, अशी याचिका पाकिस्तानी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दलिप सिंग यांचे वंशज महाराजा रंजित सिंग यांच्याकडून इंग्लंडने कोहिनूर हिरा हिसकावल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर कोहिनूर इंग्लंडमध्ये नेण्यात आल्याचे जाफरी यांनी याचिकेत म्हटले आहे.
कोहिनूर हिरा सन १८५०मध्ये राणी व्हिक्टोरियाला भेट देण्यात आला होता, त्यानंतर १९५३ साली राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या राजमुकुटात हा हिरा विराजमान झाला होता. या हिऱ्याचे वजन १०५ कॅरेट असून, त्याची किंमत अब्जांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. मात्र, राणी एलिझाबेथला हा हिरा स्वत:जवळ ठेवण्याचा कोणताही हक्क नाही. कोहिनूर हिरा हा पंजाब प्रांताचा ऐतिहासिक ठेवा असल्याने त्याच्यावर येथील नागरिकांचा हक्क आहे, असे जाफरी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
त्यामुळे पाकिस्तान सरकारने ब्रिटिशांकडून कोहिनूर हिरा परत आणावा, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे.
यापूर्वी भारताने अनेकदा कोहिनूर परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. याबाबत ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अनेकदा चर्चाही झाली होती. मात्र, ब्रिटनकडून वेळोवेळी ही मागणी फेटाळण्यात आली होती. मध्यंतरी ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांनी ‘कोहिनूर’ भारताला परत देण्याची मागणी उचलून धरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबरमधील ब्रिटन दौऱ्याच्यावेळी कोहिनूर त्यांच्याकडे देण्यात यावा, असे कीथ यांनी म्हटले होते. वाझ हे गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटनमध्ये खासदार असून यापूर्वीही त्यांनी कोहिनूर भारताला परत करण्याबाबत मोहीम राबवली होती