दहशतवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडताना दिसत आहे. अमेरिकेनंतर आता ब्रिटिश संसदेनेही पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी पाऊल टाकले असून शुक्रवारी त्यांनी एक याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तान दहशतवादावर नेहमी दुटप्पी भुमिका घेत आला आहे. ते दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना केवळ आसरा देत आलेले नाहीत तर त्यांनी आर्थिक मदतही ते करतात. पाकिस्तानची ही खेळी जगातील दहशतवाद संपवण्यामध्ये अडसर ठरत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
ब्रिटिश सरकार आणि संसदने आपल्या वेबसाईटवर ही याचिका अपलोड केली आहे. ‘ब्रिटिश सरकार दहशतवाद्यांना संरक्षण देण्याच्या पाकिस्तान सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करतो’ असे याचिकेचे शीर्षक आहे. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानात लपला होता. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे घोषित दहशतवादी संघटनांना पाकिस्तान नेहमी मदत करत असतो.
दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या सहकार्याबद्दल याचिकेत म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी अमेरिकेत ९/११ हल्ला केला. भारतात मुंबईवर, संसदेवर हल्ले करण्यात आले. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरला आहे. या सर्व प्रकरणात दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणांची मदत मिळाली आहे. जॉर्ज टाऊन विद्यापीठातील प्राध्यापक डॅनियल बेमेन यांनी तर पाकिस्तान हा दहशतवादाला प्रोत्साहन देणारा जगातील सर्वात मोठा देश असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटिश संसदेत या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी याचिकाकर्ते खासदारांनी केली आहे. यासाठी सुमारे एक लाख लोकांची स्वाक्षरी आवश्यक आहे. आतापर्यंत या याचिकेवर १८९६ लोकांनी स्वाक्षरी केली आहे. याचिकेची अंतिम मुदत ही २९ मार्च २०१७ पर्यंत आहे.