आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमतीत लागोपाठ तिसऱ्यांदा घसरण झाल्याने देशात पेट्रोल व डिझेलचे दर सातव्यांदा कमी करण्यात येत असून दरकपात मध्यरात्रीपासून लागू होत आहे. पेट्रोल ९१ पैशांनी, तर डिझेल ८४ पैशांनी कमी केले जात आहे.
दिल्लीत पेट्रोलच्या प्रति लिटरसाठी आता ६३.३३ रु. तर डिझेलला प्रति लिटरमागे ५२.५१ रु. मोजावे लागतील. मुंबईत आता ९६ पैशांनी पेट्रोल स्वस्त होत असून प्रति लिटरमागे  ७०.९५ रु. द्यावे लागतील. मुंबईत डिझेल लिटरमागे ९३ पैशांनी कमी होणार आहे. तेथे डिझेलसाठी दर लिटरमागे ६०.११ रु. मोजावे लागतील.
राज्याराज्यांमधील विक्रीकर तथा मूल्यवर्धित करात फरक असल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या प्रति लिटर दरामागे काही बदल होतील. याआधी, १ नोव्हेंबर रोजी पेट्रोल व डिझेलच्या प्रति लिटर दरामध्ये अनुक्रमे २.४१ रु. व २.२५ रु. कपात करण्यात आली होती. त्याही वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेलाच्या दरांमध्ये मोठी घट झाली होती. ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात सलग सातव्यांदा कपात करण्यात आली असून डिझेलचे दर ऑगस्टपासून तिसऱ्यांदा कमी करण्यात आले आहेत. यामुळे ऑगस्टपासून पेट्रोलचे दर ९.३६ रुपयांनी कमी झाले आहेत.