आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या घटलेल्या किमती तसेच डॉलरच्या मुकाबल्यात रुपयाचे सुधारलेले मूल्य, यामुळे पुढील आठवडय़ाच्या प्रारंभीच पेट्रोल लिटरमागे एक रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र डिझेलवरील अनुदान दर महिन्यास कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून डिझेलच्या दरात प्रती लिटरमागे ५० पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या सुधारित दरांची घोषणा ३१ मार्च रोजी संबंधित तेल कंपन्यांकडून केला जाईल, असा अंदाज आहे. अमेरिकी डॉलरसाठी याआधी ६१.४४ रु. मोजावे लागत होते. आता हा दर ६०.५० रु. झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसोलिनच्या प्रती बॅरल दरातही ११८.०९ डॉलरवरून ११५.७३ डॉलपर्यंत घट झाली आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करणे शक्य होणार असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.