वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेल बुधवारी मध्यरात्रीपासून स्वस्त होणार आहे. पेट्रोलच्या दरात ८० पैशांची तर, डिझेलच्या दरात १ रूपया ३० पैशांची घट होणार आहे. त्यामुळे अच्छे दिनाची वाट पाहणा-या सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नवे दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होतील. नुकतेच १ एप्रिल रोजी  तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ४९ पैसे तर, डिझेलच्या दरात १ रुपया २१ पैशांची घट केली होती. त्यानंतर पुन्हा आता दोनच आठवड्यांत वाहनधारकांना खुशखबर मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे.