लखनौत २३ जणांना अटक

ग्राहकांनी जेवढय़ा पेट्रोलसाठी पैसे मोजले आहेत, त्यापेक्षा पाच ते दहा टक्के कमी पेट्रोल देऊन त्यांची फसवणूक करण्याचे लखनौतील पेट्रोलपंपांवरील मोठे रॅकेट उत्तर प्रदेश पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. पेट्रोल देणाऱ्या यंत्रात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून लखनौ शहरातील पेट्रोलपंपांचे चालक ही फसवणूक करत असल्याचे राज्य पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) पथकाच्या तपासणीत आढळले. या प्रकरणात गुंतलेल्या २३ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

अशा प्रकारचा घोटाळा करणारे सर्व सातही पेट्रोलपंप सील करण्यात आले आहेत. लखनौतील राजेंद्र नावाच्या इलेक्ट्रिशियनने अनेक पेट्रोलपंपांना या चिप विकल्या असल्याचा एसटीएफच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी राजेंद्रला अटक  केली. स्वत:ची ‘तज्ज्ञ इलेक्ट्रिशियन’ म्हणून ओळख करून देणारा राजेंद्र अनेक वर्षे पेट्रोलपंपांवर काम करत होता, असे एसटीएफच्या प्रवक्त्याने सांगितले.

एसटीएफच्या म्हणण्यानुसार, सुमारे ५-६ वर्षांपूर्वी दिल्लीतील काही लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला ही चिप व तिच्या ‘फ्युएल डिस्पेन्सिंग मशीन’मधील वापराबाबत माहिती मिळाल्याचे राजेंद्रने सांगितले. ही चिप बसवलेल्या शहरातील अनेक पेट्रोलपंपांची नावे त्याने सांगितली. ही चिप एका रिमोट कंट्रोल उपकरणाच्या साहाय्याने वापरता येत होती. गुरुवारी छापे घालण्यात आलेल्या पेट्रोलपंपांमध्ये भारत पेट्रोलियमचे ५, तर इंडियन ऑइलचे २ पंप आहेत.

तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एसटीएफने केलेल्या तपासणीत, या ठिकाणच्या यंत्रांमधून ५ ते १० टक्के कमी पेट्रोल दिले जात होते असे दिसून आले. संबंधित पेट्रोलपंपांवर हजर असलेले डीलर, व्यवस्थापक किंवा रोखपाल यांच्याकडून १५ इलेक्ट्रॉनिक चिप आणि २९ रिमोट कंट्रोल उपकरणे जप्त केल्याचा दावा एसटीएफने केला.

असा होत होता घोटाळा..

  • ’पेट्रोल भरल्या जाणाऱ्या मशीनमध्ये चिप बसवली जायची
  • ’चिपला दूरनियंत्रकाद्वारे नियंत्रित केले जायचे
  • ’पेट्रोल भरतेवेळी दूरनियंत्रकाचा वापर करून इंधन कमी भरले जायचे
  • ’संशय आल्यास चिप मशीनमधून काढून घेतली जायची