दहशतवादी हल्ल्यानंतर आता सायबर हल्ल्यांनी जगभरातील सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढवली आहे. मंगळवारी पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने युरोपसह जगभरातील देशांना लक्ष्य केले. भारतालाही या हल्ल्याची झळ बसली असून जेएनपीटी येथील कामकाज ठप्प पडल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

गेल्या महिन्यात जगातील सुमारे १५० देशांना वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसचा फटका बसला होता. रॅन्समवेअर हा मालवेअरचा एक प्रकार असून यामुळे कॉम्युटरमधील डेटा रिमोटच्या मदतीने लॉक करता येतो. रॅन्समवेअरच्या मदतीने हॅक केलेला कॉम्प्युटर अनलॉक करण्यासाठी हॅकर्स पैशांची मागणी करतात. मंगळवारी पुन्हा एकदा रॅन्समवेअरने जगभरातील देशांना लक्ष्य केले. मंगळवारी पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने हल्ला केला. पिटरॅप हे वान्नाक्राय या व्हायरसचे नवीन व्हर्जन असल्याचा अंदाज आहे.

रशिया, फ्रान्स. स्पेन आणि युरोपमधील अन्य देशांमधील ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, ऑईल आणि गॅस कंपन्या या सायबर हल्ल्यांमधील प्रमुख होत्या. युक्रेनला या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसल्याचे समजते. सरकारी विभाग, वीज कंपन्या आणि बँकांमधील कॉम्प्यूटर बंद पडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेलाही या हल्ल्याचा फटका बसू शकतो असे जाणकारांचे मत आहे.

भारताला या हल्ल्याची झळ बसणार नाही असे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र मंगळवारी रात्रीपासून जेएनपीटीतील ऑनलाईन कामकाज ठप्प पडल्याचे समजते.