कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असलेल्यांसाठी खूशखबर आहे. ईपीएफओच्या योजनेत २० वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे गुंतवणूक केल्यास त्यांना ‘लॉयल्टी कम लाईफ’नुसार, ५० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक फायदा मिळू शकतो. ईपीएफओच्या मंडळाने तसा निर्णय घेतला आहे. हा आर्थिक लाभ आजीवन अपंगत्व आलेल्या मात्र, २० वर्षांहून कमी कालावधीपर्यंत गुंतवणूक केलेल्या सदस्यालाच मिळू शकतो. तसेच सदस्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किमान अडिच लाख रुपये दिले जातील, अशी शिफारस ईपीएफओच्या मंडळाने केली आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज – सीबीटीची बुधवारी बैठक झाली. त्यात कर्मचाऱ्यांच्या गुंतवणुकीशी संबंधित विमा योजनेत सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीनुसार, अडिच लाख रुपयांची किमान मदत निश्चित करण्यात आली आहे. बोर्डाने सूचवलेल्या सुधारणांना केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. सुरुवातीची दोन वर्षे ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली जाणार आहे. त्यानंतर योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. सीबीटीच्या शिफारशीनुसार, वयाची ५८ किंवा ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व सदस्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे.