भारतासह जगभरात आयसिससाठी भरती करणाऱ्या कारेन आयेशा हमिदन या महिलेला फिलिपाईन्समधून अटक करण्यात आली आहे. कारेनने भारतातील तरुणांचे ब्रेनवॉश करुन आयसिसमध्ये सामील करुन घेतले होते. कारेनबाबत माहिती गोळा करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) फिलिपाईन्सशी पत्रव्यवहारही सुरु केला आहे.

फिलिपाईन्समधील तपास यंत्रणा नॅशनल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एनबीआय) आयसिससाठी सोशल मीडियाचा वापर करुन मोहीम राबणाऱ्या कारेन आयेशा हमिदनला दोन दिवसांपूर्वी अटक केली. हमिदनचा पती मोहम्मद जफर माकिद हादेखील आयसिसमध्ये दहशतवादी होता. मात्र एका कारवाईत त्याचा मृत्यू झाला होता. हमिदन २०१६ पासून भारतातील तपास यंत्रणांच्या रडारवर होती. भारतासह सुमारे १२ देशांच्या तपास यंत्रणा हमिदनच्या मागावर होत्या. हमिदन फेसबुक, टेलिग्राम आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून तरुणांना गाठून त्यांचे ब्रेनवॉश करायची आणि आयसिसमध्ये भरती करुन घ्यायची.

भारतीय तपास यंत्रणांनी सुदानमधून परतलेल्या दोन तरुणांना अटक केली होती. हे दोघेही आयसिसचे हस्तक होते. या दोघांनी चौकशीत कारेनमुळे आयसिसच्या संपर्कात आल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून पोलीस कारेनचा शोध घेत होते. मुंबई, हैदराबाद, श्रीनगर, कानपूर या शहरांमधील दहशतवाद्यांच्या ती संपर्कात होती, अशी माहिती समोर आली आहे.

हमिदन ही भारतीय वंशाची आहे. भारतातील तपास यंत्रणांनी हमिदनच्या फिलिपाईन्समधील घराचा पत्ता, सोशल मीडियावरील तिच्या प्रोफाईलची माहिती फिलिपाईन्समधील यंत्रणांना दिली होती. हमिदन ही आयसिसच्या हनीट्रॅपमध्ये सामील होते, असेही सांगितले जाते.