हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले शिवाजीमहाराज यांच्या जीवनावरील शंभर चित्रांचे पुस्तक हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रकाशित करण्यात आले. ही चित्रे स्थानिक आदिवासींनी काढलेली आहेत.  शिवाजी-द रियल हीरो या पुस्तकाची प्रत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अनिवासी भारतीय व मजूर पक्षाचे खासदार कीथ वाझ यांनी प्रदान केली. हाऊस ऑफ कॉमन्सच्या चर्चिल कक्षात हा कार्यक्रम गुरुवारी रात्री झाला. नेपोलियनच्या जीवनावरील २.५ लाख पुस्तके खपली. शिवाजीमहाराजांच्या जीवनावरील फार थोडी पुस्तके दहा वर्षांत खपली असतील, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या वेळी व्यक्त केली.
या वेळी वाझ यांनी सांगितले, की आपण हे पुस्तक विकत घेऊन ब्रिटिश संसदेच्या ग्रंथालयात ठेवणार आहोत, त्यामुळे खासदार व इतरांनाही शिवाजीमहाराजांच्या कार्याची ओळख होईल.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले, की ८८ पानांचे हे पुस्तक भारतीय भाषांतही प्रकाशित करावे. वाचकांमध्ये पूर्वीच्या भारतीय राज्यकर्त्यांच्या जीवनावरील पुस्तके विकत घेण्याचा उत्साह नसतो. पण नेपोलियनच्या जीवनावरील २.५ लाख पुस्तके खपली. शिवाजीमहाराजांच्या जीवनावरील फार थोडी पुस्तके दहा वर्षांत खपली असतील. आताच्या पुस्तकाच्या पाच हजार प्रती काढल्या असल्या तरी केवळ पन्नास विकल्या गेल्या आहेत.
शिवाजी- द रियल हीरो हे शिवाजीमहाराजांच्या जीवनावरील पुस्तकत्रयीचा भाग असून, त्यात महाराष्ट्रातील पालघरचे ब्रीजेश मोगरे यांनी काढलेल्या १०० चित्रांचा समावेश आहे. पुरंदरे यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, की शिवाजीमहाराज या ऐतिहासिक व्यक्तीविषयी मोगरे यांची आधुनिक कलेच्या दृष्टिकोनातून साकारलेली जाणकारी अजोड आहे. अतिशय सुंदर अशी चित्रे त्यांनी साकारली आहेत, या कलेवरची त्यांची हुकमत त्यातून जाणवते.