अटक टाळण्यासाठी हजारो महिला व लहान मुलांची ‘ढाल’ करीत आश्रमात लपलेला ६३ वर्षीय स्वयंघोषित संत रामपाल याला बुधवारी रात्री अखेर अटक झाली. त्याला गुरुवारी हिस्सार न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल आहे. रामपालला अटक झाली तेव्हा आश्रमात चार महिला संशयास्पदरित्या दगावलेल्या आढळल्या. दोन महिलांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला.
गेले काही दिवस रामपालला पकडण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना झुंजावे लागत होते. आश्रमातील महिला आणि लहान मुलांची मोठी संख्या लक्षात घेऊन कारवाईत संयम बाळगावा लागत होता. रामपालने १५ हजार भाविकांचा संरक्षक ढालीसारखा वापर करण्यासाठी आपल्या सशस्त्र गुंडांच्या जोरावर आश्रमातच रोखले होते, हेदेखील उघड झाले होते. त्यात न्यायालयाने निर्वाणीचे आदेश देऊनही राज्य आणि केंद्र सरकारकडून म्हणावे त्या जोमाने प्रयत्न होत नव्हते. त्यामुळे एक स्वयंघोषित संत सरकारला वेठीस धरत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अखेर मंगळवार आणि बुधवारी पोलिसांनी आणि जवानांनी धडक कारवाई सुरू करीत १५ हजार भाविकांना बाहेर काढण्यात यश मिळविले आणि रामपालच्या अटकेच्या कारवाईला वेग आला.
२००६मधील हत्याप्रकरणातील आरोपी म्हणून हरयाणा उच्च न्यायालयाने रामपाल याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश गेल्या शुक्रवारी दिले होते. मात्र, रामपालने न्यायालयात जाणे टाळले. गेल्या तब्बल ४० सुनावणीत रामपालने हजेरी लावली नसल्याने अखेर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटच बजावल्यानंतर हे नाटय़ सुरू झाले होते. गेल्या दोन दिवसांत तर पोलिसांवर दगडफेक, गोळीबार आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यापर्यंत रामपालच्या समर्थकांची मजल गेली होती.