पंजाबमध्ये पठाणकोट येथे सीमेलगत गुरुवारी एक पांढरे गुप्तहेर कबूतर पकडण्यात आले असून ते शांतीचा संदेश घेऊन आलेले नाही तर पाकिस्तानी अतिरेकी संघटनांनी ते सोडलेले आहे, त्यामुळे गुप्तहेर खाते व पंजाब पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. जम्मू व पठाणकोट भागात इंडियन मुजाहिद्दीन
सक्रिय असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने पंजाब पोलिसांना दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर ही घटना घडली आहे.
या कबूतरावर एक संदेश असून त्याच्या शरीरात वायरसारखा घटकही आहे. त्यामुळे सुरक्षा संस्थांच्या दृष्टीने हे कबूतर महत्त्वाचे बनले आहे. त्याच्यावर उर्दूत संदेश लिहिला असून तो अंकांच्या स्वरूपात आहे. तो एक लँडलाइन फोननंबर असून पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्य़ातील आहे.
पाकिस्तान सीमेपासून ४ कि.मी. अंतरावर मनवाल खेडय़ात रमेशचंद्र यांच्या केश कर्तनालय दुकानाजवळ हे कबूतर माती व विटांच्या घरावर सायंकाळी साडेसहा वाजता उतरले. रमेशचंद्र यांच्या चौदा वर्षांच्या मुलाला त्याच्या अंगावर उर्दू संदेश पाहून संशय आला नंतर त्याने जवळच्या पोलिस स्टेशनला रात्री नऊ वाजता माहिती दिली. या मुलाने आणलेले कबूतर पाहून पोलिस स्टेशनमध्ये खळबळ उडाली.
दुर्दैवाने सीमा भागात मोबाइल फोन काम करीत नाहीत, त्यामुळे माझ्या मुलाने थेट पोलिस चौकी गाठली असे चंद्र यांनी सांगितले. नंतर पोलिसांनी या कबूतराला पक्ष्याच्या पठाणकोट येथील रुग्णालयात नेऊन क्ष किरण तपासणी केली, त्यातून काही माहिती मिळाली नाही. नंतर ते कबूतर आमच्याच ताब्यात ठेवले, असे पठाणकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राकेश कौशल यांनी सांगितले.
गुप्तहेर पक्षी येण्याच्या घटना घडत असतात व आम्ही असे पक्षी पकडलेही आहेत; कारण हा भाग संवेदनशील आहे, जम्मूच्या जवळ असल्याने घुसखोरीसाठी असे प्रयत्न केले जातात. बामियाल पोलिस चौकीत पोलिसांनी डायरीत या गुप्तहेर कबूतराची नोंद केली असून सीमा सुरक्षा दल व गुप्तचर खात्याशी संपर्क साधला आहे. पंजाब पोलिस व भारतीय लष्क र यांच्यात आंतरराज्य बैठक चालू असतानाच हे कबूतर सापडले आहे. पंजाबचे पोलिस महानिरीक्षक ईश्वर शर्मा यांनी सांगितले, की रणजित सागर धरणाच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली व त्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.