इंडोनेशियात प्रवासी विमानाचे अपहरण झालेले नसून, एका मद्यधुंद प्रवाशाने कॉकपीटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच वैमानिकाने धोक्याची सूचना देणारे बटण दाबल्याचे व्हर्जिन ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱयांनी सांगितले. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापक हेरू सुजामिको म्हणाले, मद्यधुंद अवस्थेतील प्रवासी अत्यंत आक्रमकपणे वागत असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. ब्रिस्बेनहून बालीला निघालेले प्रवासी विमान आणीबाणीच्या स्थितीत उतरविण्यात आल्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. वैमानिकाने विमानातील धोक्याची सूचना देणारे बटण दाबल्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, हे विमान तळावर उतरल्यानंतर घडलेला सर्व प्रकार उघडकीस आला आणि या विमानातून प्रवास करणाऱय़ा प्रवाशांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला.