न्यू होरायझन्स अवकाशयानाच्या मदतीने नासाचे संशोधन; भूगर्भीय स्थिती आश्चर्यकारक
बटूग्रह असलेल्या प्लुटोवर नासाच्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाला गोठलेल्या हिमनद्या दिसून आल्या असून बर्फाच्या तरंगत्या टेकडय़ाही दिसून आल्या आहेत. त्यामुळे तेथील भूगर्भीय स्थिती आश्चर्यकारक असून तेथील भूगर्भात अनेक अभिक्रिया घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बर्फाच्या तरंगत्या टेकडय़ा या अनेक किलोमीटर लांब असून त्यांची छायाचित्रे न्यू होरायझन्स या अवकाशयानाने टिपली आहेत. या बर्फाळ टेकडय़ा प्लुटोवरील हृदयाच्या आकाराच्या स्पुटनिक प्लॅनम या भागात आहेत. त्या भागाच्या पश्चिमेला मोठे बर्फाळ पर्वत आहेत. त्यांची ही लहान आवृत्ती आहे. नासाच्या मते तेथील भागात अनेक वैशिष्टय़े दिसून येतात.
पाण्याचा बर्फ हा नायट्रोजन बर्फापेक्षा कमी घनतेचा असल्याने पाण्याच्या बर्फाचे टेकडय़ांसारखे भाग तरंगताना दिसतात. त्या गोठलेल्या नायट्रोजनच्या सागरावर आहेत व पृथ्वीच्या आक्र्टिक महासागरातील बर्फाच्या हिमनगांसारख्या फिरत असतात.
या टेकडय़ा स्पुटनिक प्लॅनम भागातील नायट्रोजन हिमनद्यांवरील साखळीच्या स्वरूपात विखुरलेल्या आहेत. हिमनद्यांच्या प्रवाहात त्या तयार झालेल्या आहेत. या टेकडय़ा मध्य स्पुटनिक प्लॅनमच्या मध्य भागातही पोहोचलेल्या आहेत व त्यामुळे नायट्रोजन बर्फाला गती प्राप्त झाली आहे.
विशिष्ट विभागात त्या कडेला ढकलल्या जातानाही दिसतात. त्या २० किलोमीटपर्यंत पसरलेल्या आहेत. उत्तरेकडील चॅलेंजर कोलेस या भागात जास्त टेकडय़ा असून त्या ६० बाय ३५ कि.मी. आकारात आहेत. नायट्रोजनचा बर्फ खोलवर आहे पण पाण्याचा बर्फ वर आहे. न्यू होरायझन्स यानाच्या मल्टीस्पेक्ट्रल व्हिजिबल इमेजिंग कॅमेऱ्याने नवीन प्रतिमा टिपली आहे. त्यात प्लुटोचा सोळा हजार किलोमीटरचा भाग समाविष्ट असून न्यू होरायझन्स यानाने गतवर्षी १४ जुलैला प्लुटोच्या जवळ जाण्याच्या १२ मिनिटे आधी हे छायाचित्र घेतले आहे.