माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विकासमंत्राचा जप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काश्मीर दौऱ्यात राज्याला ८० हजार कोटींची मदत योजना जाहीर केली आहे. जम्मू-काश्मीरला प्रगतशील, आधुनिक व संपन्न राज्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आर्थिक मदतीने राजकीय प्रश्न सुटत नसतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

या मदत योजनेतून राखीव बटालियनच्या माध्यमातून ४ हजार युवकांना रोजगार मिळेल. पश्चिम पाकिस्तानातून आलेले निर्वासित व काश्मिरी पंडित यांचे पुनर्वसन केले जाईल, असे मोदी यांनी सांगितले. उधमपूर-रामबन व रामबन-बनीहाल या चारपदरी मार्गाचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते झाला. काश्मीरचा क्रिकेटपटू परवेझ रसूल याचा उल्लेख करून ते म्हणाले, की जर रसूलसारखा क्रिकेटपटू काश्मीरमधून घडू शकतो, तर येथे आंतरराष्ट्रीय सामना का होत नाही. यापुढे श्रीनगरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होईल. माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या काश्मिरीयत, जम्हुरीयत व इन्सानियत या त्रिसूत्रीचा उच्चार करीत त्यांनी सांगितले, की विकासाचे तीनही खांब काश्मीरसाठी महत्त्वाचे आहेत. काश्मीरविषयी मला कुणाच्या सल्ल्यांची गरज नाही. अटलजींची तीन तत्त्वे राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहेत काश्मिरीयत के बिना हिंदुस्थान अधुरा हैं. सुफी परंपरा या देशात काश्मीरमुळे आहे. त्यांनी एकता व एकात्मता शिकवली.
गर्दी जमवल्याचा आरोप
पीडीपी कार्यकर्ते व सरकारी कर्मचाऱ्यांचाच भरणा सभेत अधिक होता. बिहार, पंजाब व उत्तर प्रदेशातील कामगार सभेसाठी आणले होते. बिहारच्या मनोज कुमार या मजुराने आपल्याला बळजबरीने सभेसाठी आणण्यात आल्याचे सांगितले.

मोदी म्हणाले..
’काश्मिरी जनता, लोकशाही आणि मानवता’ हा मंत्र घेऊन मला पुढे जायचे आहे. काश्मीरच्या विकासाचे हे तीन स्तंभ आहेत.
’काश्मीरला दिलेली ८० हजार कोटींची मदत हा पूर्णविराम नाही. ही तर सुरुवात आहे.
’येत्या काळात काश्मीर एक आधुनिक आणि विकसित राज्य म्हणून संपूर्ण जगाला पाहायला मिळेल.