लोकसभा निवडणूकीत हायटेक प्रचार करणारे नरेंद्र मोदी यांनी भारताचे १५वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केल्यानंतर ताबडतोब कामाला लागल्याचे दिसत आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिल्यानंतर दुस-याच क्षणी पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ pmindia.nic.in हे अपडेट झाले असून मुखपृष्ठावर मोदी यांचे छायाचित्र झळकताना पहावयास मिळत आहे. या संकेतस्थळावर गेले असता भारत आणि जगभरातील नागरिकांना उद्देशून नरेंद्र मोदींचा स्वागतपर संदेश तसेच मोदींशी संबंधित माहिती आणि छायाचित्रे झळकण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सुरू असणाऱ्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी या संकेतस्थळावर विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुखपृष्ठावरच नरेंद्र मोदींची राष्ट्रपती, भाजप नेते आणि त्यांच्या आईबरोबरची छायाचित्रेही झळकताना पहावयास मिळत आहेत. शपथविधीच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी ट्विटर आणि फेसबुक प्रसिद्ध केलेल्या प्रतिक्रियासुद्धा या संकेतस्थळावर पहायला मिळत आहेत.
भारताचे १५वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी ‘नो युवर प्राईम मिनिस्टर’ या पर्यायावर जाता येईल. तसेच पंतप्रधान कार्यालय आणि एनडीए सरकारची अधिक माहिती मिळविण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरील ‘विश दी प्राईम मिनिस्टर’ हा पर्याय तुम्हाला थेट नरेंद्र मोदींच्या अधिकृत संकेतस्थळावर घेऊन जातो. त्यामुळे नागरिकांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधापदाच्या शुभेच्छा देता येणे शक्य झाले आहे.