सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना भारताने बुधवारी रात्री चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराने अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. विशेष म्हणजे शत्रू पक्षाच्या सीमेत घुसून कारवाई करण्याच्या निर्णयाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह देशातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना दिली होती. दरम्यान, गुरूवारी सांयकाळी चार वाजता गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.
बुधवारी सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या देशातील सर्व प्रमुख नेत्यांना दिली होती असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
गृहमंत्रालयाने पंजाबचे मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलामनबी आझाद यांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली होती.
सर्जिकल स्ट्राईकनंतर केंद्र सरकारने त्वरीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. दुपारी चार वाजता ही बैठक गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या बैठकीत भारताच्या पाकिस्तान सोबतच्या संबंधांविषयी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवण्याची मागणी सोशल मीडियातून केली जात होती. भारताने म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईप्रमाणे पाकिस्तानमध्येही कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात. भारतीय लष्करानेही म्यानमारप्रमाणेच ही कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या
सीमेवर हालचाली तीव्र, पंजाबमधील काही गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? तो कसा केला जातो?
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला; डीजीएमओंची माहिती
भारताने सर्जिकल स्ट्राईक नव्हे तर केवळ गोळीबार केला- पाकिस्तान
आमच्या शांतपणाला दुबळेपणा समजू नये; नवाज शरीफांची दर्पोक्ती    
काश्मीरसंदर्भात पाकिस्तानची बाजू महत्त्वाची, चीनचा भारतावर कुरघोडीचा प्रयत्न
उरी हल्ल्याचा भारताने घेतला बदला, सर्वच क्षेत्रातून पडसाद उमटण्यास सुरुवात
मोदींनी दिली पाकिस्तानला शिक्षा, ट्विटरवर चर्चा