दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपले मौन सोडत महिलांना सुरक्षा देण्याबाबतच्या उपाययोजनावर सरकार सखोल विचार करेल असे सांगितले. मनमोहन सिंग म्हणाले कि, सर्वजण पीडित तरूणीला घेऊन चिंतित आहेत मात्र सर्वांनी शांतता राखावी.
पंतप्रधानांनी काल (रविवार) रात्री उशीरा दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, या घटनेबाबत जनतेचा प्रक्षोभ योग्यच आहे आणि दिल्लीत झालेल्या या बीभत्स प्रकाराचा आम्ही निषेध करतो.  
आम्ही पीडित तरूणीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहोत. आपण सर्वांनी मिळून या तरूणीच्या आणि तीच्या कुटूंबीयांसाठी प्रार्थना करूया, असं पंतप्रधान म्हणाले.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीबाबत मला अतीव दु:ख होत आहे. मी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो, असंही ते म्हणाले. त्यांनी संपूर्ण देशातील महिलांच्या सुरक्षेची ग्वाही देत सांगितले कि, मी तुम्हा सर्वांना विश्वास देतो कि, या देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील. आमच्या या प्रयत्नामध्ये मदत आणि समाजाने शांतता राखून सहयोग द्यावा असं पंतप्रधान पुढे म्हणाले.