टू-जी दूरसंचार परवान्यांच्या प्रश्नावर सहकार्य करावे, अन्यथा विपरीत परिणाम भोगावे लागतील, असा इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्याला दिला होता, असा आरोप ‘ट्राय’चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केल्याने खळबळ उडाली आहे.

केंद्रातील यूपीए सरकारच्या कारभारावर टीका करणारे आणखी एक पुस्तक प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये बैजल यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना आपण टूजी घोटाळ्यात गोवावे, अशी सीबीआयची इच्छा होती, असेही बैजल यांनी आपल्या पुस्तकांत नमूद केले आहे. बैजल हे टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आहेत.
‘द कम्प्लीट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉम्र्स : टूजी, पॉवर अ‍ॅण्ड प्रायव्हेट एण्टरप्राइज – ए प्रॅक्टिशनर्स डायरी’ या पुस्तकात बैजल यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. एनडीए सरकारने २००३ मध्ये बैजल यांची ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. टूजी घोटाळा यूपीएच्या सरकारमधील दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांच्या कार्यकाळापासून सुरू झाल्याचेही बैजल यांनी म्हटले आहे.आपण प्रत्येक खटल्यात सहकार्य करावे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आपल्याला सीबीआयने दिला होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. सिंग यांनीही आपल्याला हाच इशारा टूजी आणि निर्गुतवणूक प्रकरणात दिला होता, असे बैजल यांनी म्हटले आहे.
आपण ज्या बाबी स्पष्ट केल्या त्या १०० टक्के सत्य असून प्रत्येक गोष्ट सिद्ध करणारा पुरावा आपल्याकडे आहे, असा दावाही बैजल यांनी केला आहे. याबाबत डॉ. सिंग यांच्याकडून त्वरित प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. डॉ. सिंग यांच्या राजवटीतील कारभाराचे स्वरूप उघड करणारे तिसरे पुस्तक गेल्या एका वर्षांत प्रसिद्ध झाले आहे. डॉ. सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू आणि त्यानंतर माजी कोळसा सचिव पी. सी. परिख यांची पुस्तके यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. त्यानंतर एकत्रित परवाना पद्धतीची शिफारस केल्यानंतर आपल्याला चांगली वागणूक देण्यात आली नाही. तत्कालीन सत्तारूढ पक्ष आपल्या विरोधात गेला. पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही मंत्र्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे.