काळा पैसा आणि विदेशातून येणाऱ्या नकली नोटांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री आठच्या सुमारास देशवासियांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात काळा पैसा आणि बोगस नोटांबाबत बोलताना त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळं देशवासियांमध्ये निर्माण होणार संभ्रम दूर केला. तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. या नोटांना बँक खाते आणि पोस्ट खात्यात जमा करू शकतात. सुरूवातीच्या काळात बँक खात्यातून ठराविक रक्कमच काढता येईल, असं त्यांनी सांगितलं. हजार आणि पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तत्काळमध्ये १० नोव्हेंबर ३० डिसेंबर या कालावधीत बँक आणि पोस्ट खात्यात ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर करून तुम्ही नोटा बदलू शकता.

९ नोव्हेंबरला सर्व बँका बंद राहणार

दरम्यान, देशभरातील सर्व बँका उद्या म्हणजेच ९ नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. आता २००० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं तसा प्रस्ताव स्वीकारला आहे. १० नोव्हेंबरलाही काही एटीएम मशीन बंद ठेवण्यात येणार आहेत.