पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारचा हवाई दौरा करत पूरस्थितीची पाहणी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी ५०० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच बिहारमध्ये मदत आणि बचावकार्य राबविण्यासाठी आणखी जी काही मदत करता येईल ती करणार आहोत असेही पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. बिहारमध्ये महापुराचा कहर माजला आहे त्यामुळे या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येत्या काही दिवसांत केंद्रातर्फे एक पथकही पाठविण्यात येईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.

शनिवारी एका विशेष विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या पूर्णियात असलेल्या चुनापूर विमानतळावर पोहचले, मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी त्यांचे स्वागतही केले. त्यानंतर या सगळ्यांनी बिहारचा हवाई दौरा करून तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. बिहारच्या १९ जिल्ह्यांमध्ये पुराचा कहर माजला आहे. तसेच या महापुरामुळे १ कोटी ६१ लाखांपेक्षा जास्त लोक पूरग्रस्त झाले आहेत.

आत्तापर्यंत या पुरामुळे एकूण ४१८ लोकांचा मृत्यू झाला आहे. काही भागांमधील पाणी ओसरू लागले आहे, मात्र पावसाचा कहर कायम आहे. एकट्या अररिया जिल्ह्यात ८६ लोकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारतर्फे छावण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एनडीआरएफतर्फे मदत आणि बचावकार्यही राबवले जाते आहे, लष्काराचे ६३० जवानही पूरग्रस्तांच्या मदतीचे कार्य करत आहेत अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. एसडीआरएफच्या १६ पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.