तीस सेकंदाचा व्हिडिओ मोबाईलवरील ट्विटर अॅपच्या माध्यमातून अपलोड करण्याची सुविधा ट्विटरने सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच या सुविधेचा वापर करीत स्वतःच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. या सुविधेचा सर्वांत आधी वापर करणाऱयांमध्ये मोदी यांचा समावेश झाला असून, त्याचे तंत्रज्ञानप्रेम यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यक्रमात बुधवारी केलेल्या भाषणाचा संपादित केलेला व्हिडिओ मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. या व्हिडिओ ट्विटला ७०० पेक्षा जास्त ट्विटरधारकांनी रिट्विट केले असून, १५०० पेक्षा जास्तवेळा तो फेव्हरिट झाला आहे. भारतामध्ये ट्विटरवर मोदींचे सर्वांधिक फॉलोअर्स आहेत. सध्या त्यांचे ९० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत त्यांचाच नंबर लागतो.


मोबाईलवरील ट्विटर अॅपच्या माध्यमातून ३० सेकंदाचा व्हिडिओ शूट करण्याची, संपादित करण्याची आणि अपलोड करण्याची सुविधा मंगळवारपासून कंपनीकडून सुरू करण्यात आली. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार ओडिओ-व्हिडिओ सुविधेच्या अकाऊंटचा वापर करणारे मोदी जगातील पहिले नेते आहेत.