जपानमध्ये रविवारी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंझो आबे यांनी शानदार विजय मिळवला. आबे यांच्या नेतृत्त्वाखालील युतीने कनिष्ठ सभागृहात दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आबे यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदींनी म्हटले.

‘माझे प्रिय मित्र शिंझो आबे यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. त्यांच्यासोबत भारत-जपानचे संबंध आणि दृढ करण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे ट्विट मोदींनी केले आहे. ‘शेजारच्या उत्तर कोरियाचे नेते किंम जोंग उन यांच्या आक्रमक धोरणाचा मुकाबला करण्यासाठी देशात अधिक भक्कम जनाधार असलेले सरकार असणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकर निवडणूक घेणे गरजेचे आहे’, अशी आबे यांची भूमिका होती. त्यामुळेच संसदेचा कालावधी पुढील वर्षी संपत असूनही आबे यांनी जपानमध्ये मध्यावधी निवडणूक घेतली.

शिंझो आबे यांच्या नेतृत्त्वाखालील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) आणि कोमितो या पक्षांच्या युतीला संसदेत दोन तृतीयांश जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत विजयासाठी संसदेतील एकूण ४६५ जागांपैकी २३३ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, आबे यांच्या नेतृत्त्वाखालील युतीला या निवडणुकीत तब्बल ३११ जागा मिळाल्या. जपानमधील ‘टीबीएएस’ या वृत्तवाहिनीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

जपानमध्ये रविवारी मध्यावधी निवडणूक झाली. यावेळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असूनही मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. या निवडणुकीत आबे यांना दुबळ्या विरोधकांचा फायदा झाला. जपानचे पंतप्रधान पुन्हा काबीज करण्यासाठी आणि संसदेतील बहुमताचा खुंटा बळकट करण्यासाठी आबे यांच्यासमोर टोकियोचे गव्हर्नर युरिको कोईके यांनी गेल्या महिन्यात स्थापन केलेल्या ‘पार्टी ऑफ होप’चे आव्हान होते. याशिवाय काही आठवड्यांपूर्वीच स्थापन झालेली कॉन्स्टिट्युशनल डेमोकॅट्रिक पार्टीदेखील (सीडीपी) निवडणुकीच्या रिंगणात होती. मात्र, या दोन्ही पक्षांना आबे यांना टक्कर देता आली नाही.