पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५०० बँकांमध्ये स्टिंग ऑपरेशन केले आहे. या स्टिंग ऑपरेशनच्या सीडी अर्थ मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. यामधील दोषींवर योग्यवेळी कारवाई करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक बँकांमधील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी गैरमार्गाने नोटा बदलून दिल्या. या सगळ्यांचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले असून त्याच्या ४०० सीडी अर्थ मंत्रालयाकडे सोपवण्यात आल्या आहेत. बँकांमध्ये काही मोजक्या लोकांची मोठी रक्कम पोलीस, दलाल आणि बँक कर्मचारी कशाप्रकारे बदलून देतात, याची सर्व माहिती या ४०० सीडींमध्ये आहे. मोठ्या शहरांसोबतच काही लहान शहरांमधील बँकांमध्ये हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे.

 

देशभरात नोटाबंदीमुळे चलन टंचाई निर्माण झाली असताना आणि बँकांसमोर मोठ्या रांगा लागल्या असताना काही बँकांमध्ये मोजक्या लोकांच्या नोटा अवैध मार्गाने जमा करुन घेण्यात आल्या. बँक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी काही लोकांना मोठ्या प्रमाणात नव्या नोटादेखील दिल्या. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता स्टिंग ऑपरेशनच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे.

 

याच आठवड्यात ऍक्सिस बँकेच्या दोन व्यवस्थापकांना ४० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ऍक्सिस बँकेकडून १९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कोलकात्यात कॅनरा बँकेच्या उपव्यवस्थापकावर, राजस्थानातील अलवरमध्ये कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर पंजाबमधील भटिंडातील ओबीसी बँकेच्या व्यवस्थापक आणि रोखपालावर कारवाई झाली आहे. बंगळुरुत सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाला तर हैदराबादमध्ये सिंडिकेट बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

 

अवैध पद्धतीने जुन्या नोटा जमा करुन घेणाऱ्या आणि नव्या नोटा देणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर लवकरच कारवाई होणार आहे. देशातील चलन संकट अद्याप कायम आहे. देशातील चलन तुटवडा संपुष्टात आणण्यात बँका आणि बँक कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे भ्रष्ट बँक कर्मचाऱ्यांवर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कारवाई केली जाऊ शकते.

 

नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांमध्ये गेल्या महिन्याभरात तब्बल २०० कोटी रुपयांचे अपहार झाले आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. काही मोजक्या व्यक्तींच्या हाती अवैध मार्गाने गेलेला हा पैसा सामान्य माणसाच्या वाट्याला आला असता तर किमान वीस लाख लोकांना २-२ हजार रुपये मिळू शकले असते. २०० कोटी रुपये जर एटीएममध्ये उपलब्ध करुन देण्यात आले असते, तर लाखो लोकांसमोरील समस्या थोड्या प्रमाणात कमी होऊ शकल्या असत्या.

 

देशातील चलन कल्लोळाचा अनेक बँक कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत स्वत:चे उखळ पांढरे केले. बँकांमधील या अवैध व्यवहारांची माहिती अर्थ मंत्रालयाला पुरवण्यात आली आहे. या प्रकरणांची आता चौकशी केली जाणार आहे. देशभरातील चलन पुरवठा सुरळीत करण्यात बँक कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने सध्या तरी भ्रष्ट आणि दोषी बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाही. मात्र पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही कारवाई केली जाऊ शकते.