पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममध्ये देशातील सर्वाधिक लांबीच्या पुलाचे उद्घाटन केले. वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवण्याची क्षमता असणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीवरील पुलाची लांबी ९ किलोमीटरहून अधिक आहे. देशातील सर्वाधिक लांबीच्या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश जोडले जाणार आहेत. यामुळे प्रवासाला लागणारा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढोला-सदिया पुलाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटनानंतर पुलाची पाहणी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी गाड्यांचा ताफा थांबवला आणि चालत जाऊन पुलाची पाहणी केली. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सुरक्षारक्षकदेखील नव्हते. यानंतर मोदी यांनी पुलावरच गडकरी आणि सोनोवाल यांच्यासोबत चर्चा केली. ९ किलोमीटरहून अधिक लांबीच्या या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील अंतर १६५ किलोमीटरने कमी झाली आहे. यासोबतच या पुलामुळे ढोला ते सदिया हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ ५ तासांनी कमी होणार आहे. तर दिवसाकाठी १० लाख रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे.

चीनचे आक्रमक आणि विस्तारवादी धोरण लक्षात घेता ब्रम्हपुत्रा नदीवरील ढोला-सदिया पूल महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या पुलामुळे चीन सीमेपर्यंत कमी वेळात पोहोचणे शक्य होणार आहे. १९६२ च्या युद्धादरम्यान अरुणाचल प्रदेश सीमेपर्यंत रसद पोहोचवणे कठीण गेले होते. मात्र ब्रम्हपुत्रा नदीवरील पुलामुळे लष्कराचे रनगाडेदेखील सीमेपर्यंत व्यवस्थित जाऊ शकतात. त्यामुळे लष्कराला या पुलाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. चीनच्या आक्रमक पवित्र्याचा विचार केल्यास ब्रम्हपुत्रा नदीवरील देशातील सर्वात मोठा पूल संरक्षणेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ढोला-सदिया १० हजार कोटींचा खर्च आला आहे. पुलाच्या निर्मितीला विलंब झाल्याने या पुलाच्या उभारणीच्या खर्चात वाढ झाली. पुलाला जोडण्यासाठी २८.५ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या पुलामुळे ढोला आणि सदिया हे अंतर अवघ्या एका तासावर येणार आहे. देशातील सर्वाधिक मोठ्या पुलामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि त्यामुळे रोजगारातदेखील वाढ होणार आहे.