पंतप्रधान नरेंद्र मोदी ही भारताला मिळालेली दैवी देणगी असल्याचे विधान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. मोदी हे गरिबांचे मसिहा आहेत. मोदी यांना भारतात परंपरेने चालत आलेल्या आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी या आव्हानांना योग्यप्रकारे मार्गी लावल्याचे सांगत नायडू यांनी मोदींचे कौतूक केले. ते रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.  दरम्यान, कार्यकरिणीच्या बैठकीत संमत करण्यात आलेल्या ठरावातील ठळख मुद्दे अधोरेखित करण्यासाठी नायडू यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेतही मोदी यांचे मोठ्याप्रमाणावर गुणगान करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी हे विकसनशील भारताचे सुधारक आहेत. ते करारी नेते आणि राष्ट्रवादी नेते असून त्यांनी देशाला पुरोगामी सरकार दिले आहे. सध्या जगभरात भारत गुंतवणुकीसाठी लोकप्रिय ठिकाण बनले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला मान्यता आणि आदर प्राप्त झाला झाल्याचे या सूचनेत म्हटले आहे.