भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये भेट घेतली आहे. भारताचा आण्विक पुरवठा संघात अर्थात (NSG) मध्ये समावेश होण्याबाबत या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.  तसेच शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कझाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. SCO चा २००१ नंतर पहिल्यांदाच विस्तार होतो आहे. या संघात भारताला स्थान मिळाल्याने चीनचे प्रभुत्त्व कमी होणार आहे असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनची सदस्य संख्या ६ वरून ८ होणारआहे. कारण या संघात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्थान मिळणार आहे. एससीओ मध्ये भारताचा सहभाग व्हावा यासाठी चीनने केलेल्या प्रयत्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांचे आभारही मानले आहेत. काही दिवसांपूर्वीच सीमा प्रश्न आणि वन बेल्ट वन रोड योजनेवरून भारत आणि चीन दरम्यान मतभेद निर्माण झाले होते. हे मतभेद दूर करण्यावरही या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली.

भारताने वन बेल्ट वन रोड परिषदेवर बहिष्कार घातला होता. त्यानंतर होणारी ही पहिलीच भेट आहे त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे. एससीओ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश होणार असल्याने भारत आणि पाकिस्तान एकाच मंचावर येतील. या दोन देशांमधले बिघडलेले संबंध, मतभेद सोडवण्यास मदत होऊ शकणार आहे.