४० वर्षांपूर्वीच्या आठवणी ‘मन की बात’ मध्ये

बरोब्बर चाळीस वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीचा उल्लेख काळी रात्र असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मन की बात कार्यक्रमातून केला. लोकशाही ही देशाची ताकद असल्याचे सांगत ती अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली.

देशावर २६ जून १९७५ रोजी आणीबाणी घोषित झाली तेव्हा साऱ्या देशाचे रूपांतर तुरुंगात झाले होते. लाखो विरोधी कार्यकर्त्यांना कारागृहात पाठवण्यात आले.  माध्यमांवर बंधने लादली. त्यामुळे अशा स्थितीत लोकशाहीचे महत्त्व अधिक आहे. आज अनेक जण मन की बात कार्यक्रमाची खिल्ली उडवतात. लोकशाहीमुळेच त्यांना टीका करणे शक्य झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. लोकशाहीत सरकार व जनतेत अंतर असता कामा नये. लोकसहभागातून देश पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

मूल्यमापनाचे आव्हान स्वीकारले
सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काही आधुनिक विचाराच्या तरुणांनी कामगिरीचे मूल्यमापन करून घेण्याचे आव्हान दिले. माझ्या काही सहकाऱ्यांनी सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात असे सर्वेक्षण करू नये अशी भीती व्यक्त केली. त्याचा दुरुपयोग होण्याची त्यांना धास्ती होती. आम्ही हे आव्हान स्वीकारून विविध भाषांमध्ये हे सर्वेक्षण केले. त्याचे निकाल काय आहेत, त्याच्या तपशिलात जाणार नाही, माध्यमांवर ते काम मी सोपवतो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. २० उपग्रह सोडून इस्त्रोने अभिमानास्पद कामगिरी केल्याचे सांगत पुण्यातील विद्यार्थ्यांचा सहभागाबद्दल गौरव पंतप्रधानांनी केला.

बेहिशेबी मालमत्ता जाहीर करण्यास शेवटची संधी
बेहिशेबी मालमत्ता ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर करा, त्यांना ही शेवटची संधी असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. दंड भरून अशा व्यक्ती चिंतामुक्त होऊ शकतील. त्यांच्या उत्पन्नांच्या स्त्रोतांची चौकशी होणार नाही. पारदर्शी व्यवस्थेचा एक भाग होण्याची त्यांना ही शेवटची संधी आहे. असे पंतप्रधानांनी बजावले.

लोकशाही म्हणजे केवळ जनतेने मतदान करायचे सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षे राज्य करायचे एवढय़ापुरता मर्यादित अर्थ नाही. तर सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यातूनच देश बळकट होणार आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान