डोक्लाम प्रश्नावर चीन काहीच करणार नाही, असा विचार भारताकडून केला जात असेल, तर भारत १९६२ प्रमाणे पुन्हा एकदा आपल्याच भ्रमात आहे, अशा शब्दांमध्ये चिनी माध्यमांनी पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. १९६२ मध्ये जवाहरलाल नेहरु यांनी केलेली चूक नरेंद्र मोदी यांनी करु नये, असा फुकटचा सल्लादेखील चिनी सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने संपादकीय लेखामधून दिला आहे. याआधीही अनेकदा ग्लोबल टाईम्सने भारताला धमकी दिली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करत राहिले, तर चिनी सैन्याकडून कारवाई केली जाऊ शकते,’ अशा शब्दांमध्ये ग्लोबल टाईम्सने भारताला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ‘भारताविरुद्ध युद्ध करण्याची जोखीम चीन पत्करणार नाही, असा विश्वास भारतीय अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळेच भारत चीनकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो आहे. मात्र चीनच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे भारताला महागात पडू शकते,’ असे ग्लोबल टाईम्सने संपादकीय लेखात म्हटले आहे.

चीनकडून भारताला पुन्हा एकदा १९६२ ची आठवण करुन देण्यात आली आहे. ‘१९६२ मध्येही भारताकडून सीमेवरील तणाव वाढवण्यात आला होता. त्यावेळी जवाहरलाल नेहरुंच्या सरकारला चीन हल्ला करणार नाही, असा पूर्ण विश्वास होता. त्यावेळी चीन अंतर्गत आव्हानांचा सामना करत होता. त्यामुळेच चीनला कमी लेखण्याची चूक भारताने केली होती. त्याचे परिणाम भारताला भोगावे लागले होते,’ अशा शब्दांमध्ये चिनी सरकारच्या सरकारी वृत्तपत्राने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे.

‘१९६२ च्या युद्धाला ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आजही भारत नेहमीप्रमाणे भ्रमात आहे. १९६२ मध्ये चीनने शिकवलेला धडा भारत ५० वर्षांमध्ये विसरला आहे. डोक्लाममधील परिस्थिती हाताबाहेर जाते आहे. याबद्दल चीनकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांकडे भारत दुर्लक्ष करतो आहे. भारताने अशाच प्रकारे चीनच्या इशाऱ्यांकडे कानाडोळा केला, तर चिनी सैन्याकडून कारवाई केली जाईल,’ असेदेखील या लेखात नमूद करण्यात आले आहे.