पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार
तब्बल ५०० भारतीयांनी करचुकवेगिरी करीत परदेशात जमविलेली ‘काळी माया’ उघडकीस आणणाऱ्या ‘पनामा पेपर्स’प्रकरणी पंधरवडय़ात प्राथमिक अहवाल द्यावा, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावरून परतताच सोमवारी ४ एप्रिलला दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने त्याच दिवशी या प्रकरणी प्रकाशित केलेल्या सांगोपांग वृत्ताची गंभीर दखल घेत मोदी यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले.
‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात या ५०० भारतीयांपैकी प्रमुख करचुकव्यांची नावे होतीच, पण या वृत्तपत्राच्या शोधपत्रकारांच्या पथकाने या यादीतील अनेक भारतीयांच्या घराचे पत्तेही पडताळून पाहिले तेव्हा धक्कादायक माहितीही हाती आली. एका भारतीयाचा पत्ता तर मुंबईतल्या चाळीतला होता.
सरकारी वर्तुळातील उच्चपदस्थाने दिलेल्या माहितीनुसार परदेश दौऱ्यावरून परतताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ एप्रिलला मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत मोदी यांनी, काळ्या पैशाप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाकडे हा तपास सुपूर्द करू नये, त्यापेक्षा अद्ययावत संगणक प्रणालीतील तज्ज्ञांच्या लहान गटाकडून हा तपास व्हावा आणि तपासात हाती येणाऱ्या तथ्यांबाबत आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळावी, अशा स्पष्ट सूचनाही दिल्या.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही ४ एप्रिललाच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विविध यंत्रणांतील तज्ज्ञांची समिती नेमली आहे. वित्तीय गुप्तचर विभाग, परकीय कर आणि कर संशोधन विभाग आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा तपास विभाग तसेच रिझव्‍‌र्ह बँकेतील तज्ज्ञांचा या समितीत समावेश आहे. मोझाक फोन्सेका या कायदे सल्लागार कंपनीच्या माध्यमातून या भारतीयांनी विविध परदेशी कंपन्यांच्या रूपाने बेकायदेशीर गुंतवणूक केल्याचे दाखवीत तसेच अन्य मार्गानीही करचुकवेगिरी केली आहे. जगभरातील अशा करचुकव्यांचा शोध जगभरातील निवडक प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी सामूहिक समन्वयातून अत्यंत गोपनीयतेने घेतला. या मोहिमेत ‘दी इंडियन एक्स्प्रेस’चाही सहभाग आहे.

तेव्हा आणि आता..
काळ्या पैशाबाबत नेमलेले विशेष तपास पथक हे त्यांच्या गतीने काम करील आणि परदेशातील काळ्या पैशाच्या गुंतवणुकीच्या मार्गाचा शोध घेण्यातही वेळ खर्च होईल. त्यामुळे निष्कर्षांप्रत येण्यास विलंब होईल. म्हणून हा तपास या पथकाकडे देऊ नये, असे मोदी यांनी सुचविल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले.