दिल्ली शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त करीत यासंबंधी पोलीसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नरेंद्र मोदींनी शुक्रवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांना बोलावून याबद्दलच्या सूचना दिल्या. गेल्या काही दिवसांत दिल्लीमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा तपास वेगाने केला जावा आणि दोषींना शोधून काढावे, असे मोदींनी यावेळी पोलीस आयुक्तांना सांगितले. याशिवाय, केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्याशीही मोदींनी याविषयी चर्चा केली. गोयल यांनी दिल्लीतील गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या वाढत्या प्रकरणांत लक्ष घालावे. तसेच शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मोदी यांनी गोयल यांना दिल्या आहेत. बस्सी यांनी यासंदर्भात बोलताना मोदींनी आपल्याला बोलावून घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वसंत विहार येथील गुन्हेगारी घटना आणि शहरातील ख्रिश्चन चर्चवर करण्यात आलेल्या हल्ल्यांविषयी उद्विग्नता व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही पंतप्रधानांना या गुन्ह्यांच्या सुरू असलेल्या तपासाविषयी माहिती पुरविली असून, यापुढच्या काळात दिल्लीतील चर्चची सुरक्षा वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी दिल्लीतील वसंत विहार येथे एका ख्रिश्चन शाळेवर काही अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला.