पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या प्रत्येक भाषणाची नेहमीच चर्चा असते. भाषणात मोदींच्या प्रत्येक शब्दाकडे सर्वांचे लक्ष असते. ‘मित्रों’ या शब्दाचा वारंवार वापर केल्याने त्यावर विनोदही झाले. विरोधकांनाही मोदींना टोला लगावताना ‘मित्रों’ या शब्दाचा वापर केला होता. मात्र प्रत्यक्षात मोदींनी ‘मित्रों’ ऐवजी ‘भाईयो आणि बहनो’ या शब्दाचा जास्त वापर केल्याचे समोर आले आहे.

‘हिंदूस्तान टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार मोदींनी मे २०१४ ते आत्तापर्यंत पासून एकूण ४४० वेळा भाषण केले. यात त्यांनी सुमारे ७५० वेळा ‘भाईयो आणि बहनो’ या शब्दाचा वापर केला. तर मित्रो या शब्दाचा त्यांनी फक्त ६१ वेळाच केला. याशिवाय २७१ वेळा देशवासियो, १२१ वेळा महानुभव आणि ८१ वेळा साथियो या शब्दाचा वापर केला. २०१५ पर्यंत मोदींच्या भाषणात मित्रो या शब्दाचा जास्त वापर होता. पण त्यानंतर मोदींनी या शब्दाचा वापर कमी केला. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर मोदींच्या सरकारी कार्यक्रमांमधील भाषणाची हिंदी प्रत असते. यावरुन ही माहिती समोर आली आहे. या भाषणांमध्ये प्रचारसभा आणि अन्य खासगी कार्यक्रमांमधील भाषणांचा समावेश नाही. या भाषणांचा अभ्यास केल्यास कदाचित वेगळे चित्रही समोर येऊ शकेल असे जाणकार सांगतात.

‘मित्रों’ऐवजी आता मोदींनी ‘दोस्तो’ या शब्दाचा वापर करण्यावर भर दिल्याचे दिसते. ‘दोस्तो’ या शब्दाचा वापर त्यांनी ४९ वेळा केला आहे. २०१६ मध्ये त्यांनी या शब्दाचा तब्बल ८ वेळा वापर केला आहे. त्यामुळे मोदी ‘मित्रो’ऐवजी ‘दोस्तो’ला साथ देतील अशी चर्चाही रंगली आहे.
नोटाबंदीदरम्यान मोदींच्या मित्रो या शब्दावरुन विनोदही झाले होते. मोदींच्या या शब्दावरुन काही ठिकाणी चक्क ऑफर्सही देण्यात आल्या होत्या. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नोटाबंदीला ५० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी देशाला संबोधित करणार होते. त्यावेळी हॉटेल्समध्ये ही ऑफर देण्यात आली होती.